डोंबिवली : जून महिन्यापासून केडीएमसीतून आधी वगळलेल्या त्या २७ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यात आला. परंतु त्या गावांच्या विकासासाठी कोणतेही विशेष धोरण ठरवण्यात आलेले नव्हते. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी एमएमआरडीएच्या बैठकीत या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी १ हजार ८९ कोटींची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निधीतून रस्ते, पाणी यासह अन्य मुलभूत गरजा भागवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या गावांचा परिसर येत्या काळात कल्याण ग्रोथ सेंटर म्हणून ओळखला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. माहिती तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान विकसीत करुन या परिसरातील लाखो युवक-युवतींसह कुशल कामगारांना रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. कल्याण ग्रोथ सेंटरच्या पहिल्या टप्पात सुमारे ३३० हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. ही जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. हे क्षेत्र निळजे रेल्वेस्टेशन व राज्य मार्ग क्रमांक ४० व ४३च्या मधील असून याच्या पश्चिमेला मेगासिटी प्रकल्प व पूर्वेला विशेष नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.
पायाभूत सुविधांसाठी केडीएमसीला हजार कोटी
By admin | Published: August 27, 2015 2:47 AM