कल्याण : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या केडीएमसी निवडणुकीच्या रिंगणात आता राष्ट्रीय समाज पक्षदेखील उतरला आहे. ४० जागा लढविण्याचा पक्षाचा निर्धार असून, कोणत्याही राजकीय पक्षाची मते खाण्यासाठी आम्ही रिंगणात उतरणार नसून पक्षाची ताकद आजमावण्यासाठी निवडणूक लढवित आहोत, असा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार महादेव जानकर यांनी रविवारी डोंबिवलीत केला.रासपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी केडीएमसीची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा केली. ‘केंद्रात आणि राज्यात भाजपा-सेनेसोबत असलो तरी स्थानिक पातळीवर प्रत्येकाने आपली ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली पाहिजे. त्यानुसार, आमच्या पक्षाचेही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जाणार असून, आदर्शवत महापालिका तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,’ असे जानकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ब्लू प्रिंट : १२२पैकी ४० जागा लढविल्या जाणार असल्या तरी सत्तेच्या राजकारणात आम्हीच किंगमेकर ठरू, असा दावा जानकर यांनी या वेळी केला. रासपचीदेखील विकासाची ब्ल्यू प्रिंट असेल, आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला राजू शेट्टी आणि रामदास आठवले हे अन्य पक्षांचे नेतेदेखील येतील, असे त्यांनी सांगितले. मंत्रीपद न मिळाल्याने आपण नाराज होऊन राजीनामा दिला, अशा वावड्या सध्या उठविल्या जात आहेत. आजही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शत्रू तर शिवसेना-भाजपा आपले मित्र असल्याचे जानकर यांनी या वेळी स्पष्ट केले. केडीएमसीबरोबरच कोल्हापूर महापालिकेच्यादेखील निवडणुका होत असून, तेथे ३५ जागा लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केडीएमसीत आम्हीच किंगमेकर!
By admin | Published: October 05, 2015 2:34 AM