अहमदनगर - केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी जगताप आणि कोतकर यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी या प्रकरणी सीआयडीने आठ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते, मात्र या आरोपींमध्ये जगताप आणि कोतकर यांचा समावेश नाही. या दोघांची कलम १७३ (८) प्रमाणे चौकशी सुरु असल्यामुळे त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं नव्हतं. या हत्याकांडामध्ये एकूण तीन आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महापालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या वादातून निकालाच्या दिवशी म्हणजेच ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा स्वत:हून पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्याच दिवशी रात्री कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये या हत्याकांडप्रकरणी मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात संदीप गुंजाळ, बी. एम.कोतकर, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब केदार, रवि खोलम, संदिप गिऱ्हे, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर व आमदार संग्राम जगताप अशा दहा जणांना अटक करण्यात आली. या सगळ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजून फरार आहेत.