पुणे : डोक शांत ठेवलं की केलेला अभ्यास आठवेल... टेन्शन न घेता पेपर लिहिता येतो... आपल्याला पेपर अवघड जाणार नाही, असा सकारात्मक भाव ठेवल्यास परीक्षा उत्तमरीत्या पार करता येते, असा सल्ला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी यंदाची बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षाकाळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना फोनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यास राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी परीक्षेच्या संदर्भात जसे की परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंदर्भात प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
डोके शांत ठेवा ; टेन्शनविना पेपर लिहा
By admin | Published: February 17, 2016 1:29 AM