आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:25 AM2021-08-20T06:25:01+5:302021-08-20T06:26:20+5:30
Ajit Pawar : पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले.
पालघर : एखादी वास्तू, प्रकल्प, योजना या लोकांच्या श्रमाच्या, घामाच्या पैशांतून उभ्या राहत असतात. आपल्याला मिळतो तो पगारही जनतेच्या पैशांतून दिला जात असल्याची जाणीव आमच्यासह सर्वांनी ठेवून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.
पालघर हा नवनिर्मित तरुण जिल्हा असून, या जिल्ह्याला विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करेल. देशात पालघर जिल्हा सर्वोत्तम जिल्हा असल्याचे आपल्या कामातून दाखवून देऊ या, असे सांगून आपला पालघर जिल्हा विविधतेने नटलेला संपन्न जिल्हा असल्याने आपण एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदी उपस्थित होते.
प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, आदी उपस्थित होते. पालघर जिल्हा आणि वसई-विरारच्या विकासाचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांपुढे तो सादर करण्यात आल्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. राजेंद्र गावित सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनीही भाषणातून आपली मते व्यक्त केली.
पॅलेसच्या धर्तीवर रचना
- संपूर्ण देशात एक रोल मॉडेल ठरेल अशा, १०३ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर, जव्हारच्या मुकणे महाराज संस्थानच्या जयविलास पॅलेसच्या धर्तीवर सिडकोने मुख्यालयाच्या इमारतीची रचना केली आहे.
- ही वास्तू उभारण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी या निर्जीव वास्तूला आपल्या कार्यातून जिवंतपणा आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
- पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात रोल मॉडेल ठरेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.