ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - 'बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांनी शंका व्यक्त कराव्यात याचे आम्हाला दु:ख होत आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत पण आपल्या लोकांनी त्यांच्या बंडलबाजीशी स्पर्धा करू नये' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सर्जिकल स्ट्राईक'चे राजकारण करणा-या नेत्यांना टोला हाणला आहे. देशातील विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक्स’च्या खरेपणाबद्दल शंका घेणारी वक्तव्ये केल्याने आणि भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत याचा राजकीय लाभ घेण्यासाठी फलक लावल्याने हा मुद्दा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय ठरला. त्याच पार्श्वभूमीवर ' सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी त्या नेत्यांना फैलावर घेतले आहे. 'ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे' असेही उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच 'चुकून पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याला चार-पाच दिवसांत परत आणू असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले खरे पण या वक्तव्याला चार-पाच दिवस उलटून गेल्यावरही चंदू चव्हाण परतला नाही. त्यामुळे संरक्षण खात्याच्या प्रमुखांनी संयम आणि जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असा टोला उद्धव यांनी मनोहर पर्रीकर यांना मारला आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतही सर्जिकल हल्ले झालेच होते, पण त्याचा राजकीय गवगवा कधीच केला नाही, असे आता अरुण शौरी यांनी सांगितले आहे. चिदंबरम यांनीसुद्धा अशा प्रकारचे टोकदार विधान आधीच केले आहे व त्यापाठोपाठ सर्जिकल हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलून अनेक दीडशहाणे पोपटपंची करू लागले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे. ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे.
- उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सूड घ्यावा, अशी मागणी देशभरातूनच उठू लागली व सूड किंवा बदला घेतल्यावर जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच जाहीर केले की, ‘हिंदुस्थानकडून अशा प्रकारचा कोणताही सर्जिकल हल्ला झाला नसून तसा हल्ला झाल्यास चोख उत्तर देऊ!’ पाकिस्तान हा एक नंबरचा बंडलबाज देश आहे. हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याची त्यांची बंडलबाजी नेहमीच सुरू असते. लादेन आमच्या देशात लपला नसल्याची थाप ते मारतच होते, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारल्यावर त्यांची बंडलबाजी उघडी पडली. दाऊद इब्राहिम कराची किंवा लाहोरमध्येच उंडारतो आहे, पण पाकिस्तानची बंडलबाजी अशी की, ‘छे, छे, कोण, कुठला दाऊद? आमच्या देशात या नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नाही!’ काय म्हणावे या बंडलबाजीस? त्या जावेद मियांदादने दाऊदच्या पोरीशी सोयरिक जमवून सत्य उघड करूनही पाकिस्तानने दाऊदबाबत आपली बंडलबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे अशा बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले.
- पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांनी शंका व्यक्त कराव्यात याचे आम्हाला दु:ख होत आहे. अरविंद केजरीवाल यांनीदेखील शंकेची पाल पंतप्रधानांवर फेकली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सर्जिकल कारवाईबाबत त्यांचे अभिनंदन, पण पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा करावा यासाठी सर्जिकल कारवाईचा एखादा व्हिडीओ अथवा छायाचित्रे लोकांसमोर आणावीत, अशी मागणी केजरीवाल यांनी करावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बंडलबाज पाकिस्तानला एकप्रकारे बळकटी देणारेच हे विधान आहे. अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तेव्हा त्या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रण जगासमोर आणले होते हे खरेच. कारण ‘लादेनला खरेच मारले की नाही? जो मारला गेला तो खरोखरच लादेन की त्याचा डुप्लिकेट?’ अशा शंका काढायला लोकांनी कमी केले नसते. त्यामुळे कारवाईचे चित्रीकरण करून सैतानास खतम केल्याचे सत्य समोर आणले होते हे मान्य केले तरी आमच्या जवानांनी केलेली कारवाई तोलामोलाचीच आहे.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात त्याप्रमाणे सर्जिकल कारवाईने पाकिस्तान बेहोश झाले की नाही ते सांगता येत नाही, पण पाकिस्तानला जबर धक्का बसला हे मान्य करायला हवे. सर्जिकल कारवाईचा राजकीय गाजावाजा जास्तच सुरू आहे, तसा तो होणारच. कारण ‘उरी’ घटनेनंतर देशात जो संताप आणि चीड निर्माण झाली त्याचे चटके सरकारला, खासकरून भाजपला बसू लागले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न पडला. त्या सगळ्यांवर सर्जिकल कारवाईची गोळी लागू पडली आहे. निवडणुकांच्या राजकीय फायद्या-तोट्यासाठी युद्ध घडवू नयेत व पंतप्रधान तसे अजिबात करणार नाहीत, पण ज्यांच्या पायाखालची सतरंजी सरकली आहे त्यांनी सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित केल्या.
- सीमेवरील एक जवान चंदू चव्हाण हा अचानक बेपत्ता झाल्याचे गूढ आहे. पाकड्यांनी जवान चंदूबाबत हात झटकले, पण संरक्षणमंत्री पर्रीकरांनी जाहीर केले, जवान चंदू चव्हाणला चार-पाच दिवसांत परत आणू. या वक्तव्याला चार-पाच दिवस उलटून गेले आहेत, पण चंदू चव्हाण परतला नाही. संरक्षण खात्याच्या प्रमुखांनी संयम आणि जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, तरच केजरीवाल यांच्या वायफळ पोपटपंचीवर इलाज करता येईल. सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित करणार्यांनाही आमचे तेच सांगणे आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल!