लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा (अहमदनगर) : कुकडीच्या जोडकालव्यास कमी कालावधीसाठी पाणी सोडल्याच्या विरोधात सोमवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. कुकडी कालव्याच्या जोड-कालव्यास अवघे दहाच तास पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्याविरोधात नगरसेवक सुनील वाळके यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी शनिचौकात राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले. श्रीगोंदा पोलिसांनी १४ कार्यकर्त्यांना अटक केली. पुतळा दहनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.आम्ही किमी १३२ जोड कालव्यास तीन दिवस पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. पण आंदोलकांनी मध्येच गेट तोडले. त्याची तक्रार अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांच्याकडे केल्याने कालवा बंद केला, अशी माहिती उपअभियंता मेमन थॉमस यांनी दिली. आम्ही तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याच्या आंदोलनात होतो, पण आ. राहुल जगताप यांचा पुतळा जाळण्याच्या आंदोलनात सहभागी नव्हतो. त्यामुळे पोलिसांनी आमची नावे या प्रकरणात टाकू नयेत, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
तहसील कार्यालयास ठोकले टाळे
By admin | Published: May 16, 2017 2:12 AM