मुंबई : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अडीच कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.भाजपच्या सदस्यता अभियानाचा प्रारंभ मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी घरांत पक्षाचे सदस्य झाले पाहिजेत. भाजपच्या या पन्नास टक्के मतांच्या फॉर्मुल्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीचे काय होणार, याची काळजी कोणीही करण्याचे कारण नाही. जिथे आपल्याला गरज लागेल तिथे आपल्या भरवशावर आणि जिथे मित्राला गरज लागेल तिथे मित्रासाठी आपण काम करू, असेही ते म्हणाले.
मुंबईत पन्नास लाख मतदार आहेत. मुंबईत भाजपचे तीस लाख सदस्य झाले पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था विस्तारल्यानंतर तरूणाईला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या व रोजगाराची संधी मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासात १०० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या विकासात महाराष्ट्र देखील मागे राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.अर्थसंकल्पातून हा देश विकासाच्या कोणत्या वाटेवर जाणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे. मात्र ही अर्थव्यवस्था विस्तारत असताना देशातील शेवटच्या घटकाला देखील त्याच्या विकासाचा भाग बनवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री विद्या ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश मेहता, संघटनमंत्री सुनील कर्जतकर आदी उपस्थित होते.