पुणे - ग्रामपंचायतीत तुम्ही योजना आणाल, अनेक गोष्टी कराल पण मला तुम्हाला एकच सूचना करायची आहे. तुम्ही प्रामाणिक आहात, लोकांचे सेवा करण्यासाठी इच्छुक आहात. तुम्ही तुमचे गाव स्वच्छ ठेवा. महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मी हा मुद्दा आणला होता. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही तर इच्छाशक्ती लागते. स्वच्छतेमुळे गाव रोगराईमुक्त राहतं असा कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ग्रामीण भागातील मनसे शिलेदारांना दिला आहे.
मनसेचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात घेण्यात आला. त्याला राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले की, मी १९८९ साली सक्रीय राजकारणात आलो. राज्यात फिरलो, अनेक गावागावात फिरलो. सगळ्या ठिकाणी मला दुरावस्था दिसली ती स्वच्छतेची. कचरा कुठेही पडलेला असतो. नाल्याचे पाणी रस्त्यावर आलंय. त्या अस्वच्छ वातावरणामुळे मनदेखील अस्वच्छ होते. जगण्याची जी इच्छा लागते ती आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे लागते. आज ग्रामीण महाराष्ट्रातील माझा तरुण-तरूणी शहरात यायला बघतायेत आणि शहरातील तरुण तरुणी परदेशात जायला बघतायेत. यामागचं कारण म्हणजे सभोवतालचे वातावरण ठीक नाही म्हणून ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायेत. त्यामुळे गावातील वातावरण बदलणं हे तुमचे पहिले काम हवं. नवनवीन कल्पना तुम्हाला सुचल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.
तसेच मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. गावात एक टाकी होती. माझ्या शालेय जीवनात मी अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत पाहिली ती म्हणजे रामगड, शोले सिनेमातील. त्या गावातील प्रमुख ठाकूर त्याच्या घरात लाईट नाही. त्या गावात गेल्यावर रामगडची टाकी आठवली. त्या टाकीत पाणी नाही. हे चित्र तुम्हाला बदलायचे आहे. तुमचे गाव तुम्ही चांगले ठेवा. गावचे वातावरण बदला. गावातील माताभगिनी महिला त्यांना राहावसे वाटले पाहिजे. तुम्हाला गावात बोलवावं वाटलं पाहिजे असं वातावरण करा. ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांचीही कामे करा. कुणावरही सूड उगवू नका. जर तुम्ही वातावरण चांगले केले तर त्या गावातून तुम्हाला कुणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलू शकत नाही असं राज ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल त्यातील जी सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल तिथे मी स्वत: येऊन ग्रामपंचायतीसाठी ५ लाखांचा निधी देईन. इतरांसारखी फक्त घोषणा करत नाही. जे तुमच्या आवाक्यात असेल त्या सर्व गोष्टी करा. लोकांचे मतरुपी आशीर्वाद मिळालेत त्यामुळे चांगले काम कायम तुमच्या हातून घडलं पाहिजे. लोकांना समाधानी ठेवा. तुम्ही इतक्या लांबून इथं आलात मला दर्शन दिले त्याबद्दल तुमचे आभारी आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
२२ तारखेला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय...
२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होतंय म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे लोकांना त्रास न होता महाआरती करा, पूजा करावी असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.