पुणे : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता कायम सतर्क राहावे लागणार आहेच, शिवाय कायकर्तेही दक्ष राहतील, याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांपासून (इन्कमटॅक्स) ते अबकारी खात्यापर्यंत (एक्साइज) व पोलिसांपासून ते परिवहन विभागापर्यंत (आरटीओ) सर्व खात्यांचा प्रत्येकी एक अधिकारी आचारसंहिता पालन समितीमध्ये असेल. हे अधिकारी त्याच्या खात्याशी संबधित गोष्टींबाबत उमेदवार व त्याचे कार्यकर्ते यांच्यावर लक्ष ठेवतील, तसेच त्यांच्यासंदर्भात आलेल्या तक्रारींचा तपासही करतील.निवडणूक आयोगानेच अशी समिती तयार करण्याबाबत आदेश दिले आहेत. या वेळी प्रथमच समितीत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिका, तसेच जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीसाठी अशा तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेची समिती कार्यरतही झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या काही तक्रारी असतील, तर त्या या समितीकडे दाखल करायच्या आहेत. खातरजमा करून तथ्य असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.या आधीच्या निवडणुकांमध्येही आचारसंहिता पालन समिती असे. मात्र, या वेळी प्रथमच त्यात प्राप्तिकर अधिकारी, तसेच अन्य काही खात्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे खर्चाला मर्यादा आल्या आहेत.उमेदवार व त्यांच्या पक्षालाही फक्त निवडणूक खर्चासाठी म्हणून बँकेत स्वतंत्र खाते सुरू करून, त्यातूनच खर्च करण्याचे बंधन आयोगाने घातले आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचा वेगळा लक्षात येईल, असा जास्तीचा खर्च दिसला किंवा त्याची तक्रार आली, तर लगेचच त्याची चौकशी समितीमधील प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येईल. (प्रतिनिधी)
प्राप्तिकर खाते ठेवणार नजर
By admin | Published: January 15, 2017 4:10 AM