उंब्रज ( सातारा ), दि. 13 - बहाणा करुन बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरुन पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. उसाच्या फडात लपून बसलेल्या या चोरट्यांना पकडून अखेर पोलिसांच्या ताब्यातही दिलं. ही रणरागिणी म्हणजे उंब्रज येथील अभियंता चाँद शेख यांच्या सूनबाई असून माहेर असलेल्या सांगली-मिरज-कूपवाड महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविकाही आहेत. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीक मागण्याचे नाटक करून चार ते पाच मुलांनी उंब्रज येथील सुरभी चौकात राहणाऱ्या चाँद शेख यांच्या बंगल्याचे दार वाजवले. नाझीया नायकवडी-शेख यांनी दरवाजा उघडला. 'काही नाही,' असे सांगून पुन्हा दरवाजा बंद करत त्या आतील खोलीत निघून गेल्या.त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी दरवाजाच्या ग्रीलमधून हात घालून हळूच दरवाजा उघडला अन आत असलेला आयफोन घेऊन पलायन केले. दरम्यान, दरवाजा वाजल्याने नाझीया पटकन बाहेर आल्या. तेव्हा फोन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या बंगल्यातून बाहेर आल्या. तोपर्यंत संबंधित चोरटे समर्थनगरकडे पळत गेले होते. त्यांनी पटकन आपली मोपेड बाहेर काढून त्यांचा पाठलाग केला. चोरटे जाधव मळ्याच्या बाजूकडील ऊसाच्या शेतात शिरले. नाझीया यांनी रस्त्यावर गाडी लावली.अन स्वतःही उसाच्या शेतात शिरल्या. चोरट्यांपैकी एक जण उसाच्या सरीत गुपचूपपणे झोपला होता. त्याला त्यांनी तेथेच पकडले. चोरट्यांनी बाजूलाच फेकून दिलेला मोबाईलही हस्तगत केला.या घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. यामुळे इतर चोरटे ऊसातून दुसऱ्या दिशेने पळून गेले. त्यानंतर नाझीया यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फोन करुन संबंधित चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, नाझीया यांना सहा महिन्यांचे बाळ आहे. चोरी झाल्यानंतर बाळाला घरात ठेवूनच धाडसाने पाठलाग करत चोरट्याला मुद्देमालासह पकडण्याचे जे धाडस त्यांनी दाखविले, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
सहा महिन्याच्या बाळाला घरात ठेवून या रणरागिणीने पाठलाग करत चोरट्यांना घडवली अद्दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 4:30 PM