प्रकाश लामणे
पुसद (यवतमाळ), दि. २१ - एक-दोन नव्हे तर तब्बल चार ते पाच मुलींच्या प्रेमात पडलेल्या कीर्तनकाराने त्यांना मोबाईल हॅन्डसेट भेट देण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग निवडल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. पोलीस कोठडीत या कीर्तनकाराने अनेक गंभीरबाबींचा खुलासा केला.
साहील संजय भोजले (१९) उर्फ साहील महाराज (सवनेकर) रा. सवना ता. महागाव जि. यवतमाळ असे या महाराजाचे नाव आहे. पुसद शहर पोलिसांनी पाकीट चोरताना त्याला अटक केली. १७ ते २० आॅक्टोबरपर्यंत तो पोलीस कोठडीत होता. गुरुवारी त्याची न्यायालयीन कोठडी अंतर्गत यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. गेल्या चार दिवसात साहीलने तपासादरम्यान अनेक बाबी पोलिसांपुढे उघड केल्या.
पोलिसांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, कीर्तनकार साहील हा दहाव्या वर्गात असताना सन २०१३ मधध्ये त्याच्यावर नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली होती. घरगुती वादामुळे सन २०१४ मध्ये त्याला मानसिक आजार जडला. पुसदलाच त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून बरा झाल्यानंतर तो पुण्याला पळून गेला. तेथे त्याने देहू, आळंदी येथे दोन वर्षे वारकरी सांप्रदाय, पोथी-पुराणाचा अभ्यास करून कीर्तनकाराचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर तो पुसदला परत आला. मराठवाड्यातील एका महाराजाच्या आक्रमक स्टाईलने तो कीर्तन करू लागला. त्यामुळे साहील महाराज भोजले (सवनेकर) या नावाने कीर्तनकार म्हणून अल्पावधीतच तो नावारुपास आला. यंदाच्या नवरात्रोत्सवात त्याने जिल्ह्यातील कळंब, घाटंजी आदी ठिकाणी कीर्तनातून समाज प्रबोधन व मनोरंजन केले. नांदेड, जालना येथेही त्याचे कीर्तन झाले. दरम्यान पुसद शहरातील चार ते पाच प्रतिष्ठीत घरातील मुलींशी साहीलचा संपर्क आला. त्यातूनच तो प्रेम जाळ्यात ओढला गेला. त्या सर्वांशी त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते.
या प्रेयसींना महागडे मोबाईल गिफ्ट देण्याचे त्याने ठरविले. त्यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग अवलंबिला. पुसद विभागात त्याने अनेक ठिकाणी हात मारला. चोरलेले मोबाईल त्याने आपल्या सवना येथील दुकानातच दडवून ठेवले. पोलिसांनी या दुकानातून सव्वा लाख रुपये किंमतीचे १३ मोबाईल हॅन्डसेट जप्त केले. त्याचे वडील भाजीपाला विक्री करून आपला संसाराचा गाडा ओढतात तर आई घरीच छोटेसे डेली निडस्चे दुकान चालवून संसाराला आर्थिक हातभार लावते. वाल्याचा वाल्मिकी होणार गुरुवारी कीर्तनकार साहीलला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, चोरीच्या या कृत्याचा आपल्याला पश्चाताप होतो आहे. यापुढे अशी चूक कधीच करणार नाही, कारागृहातून सुटका होताच ह्यवाल्याचा वाल्मिकीह्ण होण्याचा प्रयत्न मी करणार आहे.