भार्इंदर : मीरा रोडच्या व्हाइट हाउस बारवर झालेल्या कारवाईप्रमाणे लव्हबर्ड बारवरसुद्धा कारवाई होण्याच्या भीतीने बारचालक महेश शेट्टीने मॅनेजर व दोन ग्राहकांच्या मदतीने स्थानिक पत्रकार राघवेंद्र दुबेची हत्या केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीतून उजेडात आला आहे. या प्रकरणी त्या दोन ग्राहकांना पोलिसांनी १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.शहरात अनधिकृत बार वाढत असताना मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क परिसरात असलेला लव्हबर्ड हा डान्स बारदेखील अनधिकृतपणे सुरू आहे. याविरोधात स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बारचा परवाना रद्द करण्याचा पत्रव्यवहार केला होता. ही कारवाई होण्यासाठी दुबेनेदेखील तक्रारी केल्याने त्याचे महेशसोबत नेहमी खटके उडत होते. १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास व्हाइट हाउस बारवर झालेल्या कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या संतोष मिश्रा, शशी शर्मा व अनिल नोटीयाल या स्थानिक पत्रकारांवर बारचालक गणेश कामतसह १३ जणांनी हल्लाबोल केला. त्यातील मिश्रा याचा संपर्क होत नसल्याने पोलिसांनी दुबे याला पोलीस ठाण्यात बोलवले होते. मध्यरात्री २ वा.च्या सुमारास तो पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तो पहाटे ५ वा.च्या सुमारास घटनास्थळी गेला होता. त्या वेळी त्याने व्हाइट हाउसनंतर लव्हबर्ड बारवरदेखील कारवाई होण्याची शक्यता एका मित्राकडे व्यक्त केली असता ते महेशने ऐकले. अगोदरच दोघांत वाद व त्यात व्हाइट हाउस बारचालकाने पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचा फायदा घेऊन दुबेची हत्या केल्यास त्याचे प्रकरण व्हाइट हाउसच्या हल्लेखोरांवरच शेकेल, या शक्यतेने महेशने मॅनेजर भावेश मोमानी, बारमधील नेहमीचे ग्राहक अविनाश निरंजन मिश्रा व समाधान उर्फ बाबू नामदेव माळी, (दोघेही रा. कांदिवली, मुंबई) यांच्यासोबत मोटारसायकलने जाऊन रिक्षातून जाणाऱ्या दुबेला एस.ए. लॉजजवळ रोखून लाकडी व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली. हल्लेखोर मीरा रोड भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा मागोवा घेऊन त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कारवाईच्या भीतीने केली दुबेची हत्या
By admin | Published: July 20, 2015 1:18 AM