रोहित नाईक, मुंबईउत्साहात पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिडिओन किपकेटर व इथोपियाच्या शुको गेनेमो यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राखले. विशेष म्हणजे, गिडिओनची बहीण वेलेंटाइन किपकेटर महिला गटात तृतीय स्थानी आल्याने, यंदाची मुंबई मॅरेथॉन किपकेटर भावंडांनी गाजवल्याचे चित्र होते. दखल घेण्याची बाब म्हणजे, गिडॉन यावेळी पेसमेकर म्हणून सहभागी झाला होता. मात्र, ३४ किमी अंतरापासून त्याने आघाडी घेत, थेट स्पर्धा विक्रम नोंदवून बाजी मारली. त्याच वेळी आर्मीच्या नितेंद्र सिंग व रेल्वेच्या सुधा सिंग यांनी भारतीय गटात सुवर्णपदक पटकावले.सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी एलिट गटाच्या मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरुवात झाली. सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मुंबईकरांनी धावपटूंचा उत्साह वाढवला. जसजसे एलिट अॅथलिट्स पुढे जात होते, तसतसे त्यांना जोरदार पाठिंबा मिळत होता. २८ किमीपर्यंत एलिट अॅथलिट्स एकत्र होते. मात्र, ३३ किमीनंतर पेसमेकर असलेल्या गिडिओनने अचानकपणे आघाडी घेत इतरांना बरेच मागे टाकले. त्याने जवळपास १५० ते २०० मीटरची आघाडी घेत विजेतेपद निश्चित केले. गिडिओनने २ तास ०८ मिनिटे ३५ सेकंदाची जबरदस्त वेळ नोंदवताना स्पर्धा विक्रम मोडला. त्याच्या वर्चस्वापुढे इथोपियाच्या सेबोका दिबाबा (२:०९:२०) आणि केनियाच्या मारीयस किमुताइ (२:०९:३९) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, संभाव्य विजेता व २०१३ साली स्पर्धा विक्रम नोंदवलेला युगांडाचा जॅक्सन किप्रोपने (२:१४:५४) थेट आठव्या स्थानी फेकला गेला. महिला गटात इथोपियाच्या शुको गेनेमो हिने बाजी मारत, २ तास २७ मिनिटे ५० सेकंद अशी वेळेसह विजेतेपद पटकावले. टॉप टेनमध्ये एकूण ५ स्थानांवर कब्जा करताना इथोपियाने दबदबा राखला. बोर्नेस कितूर (२:३२:००) आणि वेलेंटाइन किपकेटर (२:३४:०७) या केनियाच्या धावपटूंनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावून चमक दाखवली. महिलांच्या एलिट गटात भारताच्या सुधा सिंगने सातवे, तर ललिता बाबरने दहावे स्थान पटकावून इथोपिया व केनियाच्या धावपटूंना चांगली टक्कर दिली.भावाच्या यशाचा आनंद...माझा भाऊ जिंकल्याचे कळताच खूप आनंद झाला. तो या मॅरेथॉनमध्ये पेसमेकर म्हणून सहभागी झाला होता. यामुळे त्याला मॅरेथॉनदरम्यान जास्त पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेता आले नाही. तरीही त्याने बाजी मारली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पुरुष गटातील विजेता गिडिओनची बहीण वेलेंटाइन हिने दिली.महिलांत अनुभवी धावपटूंनी वर्चस्व सुधा सिंग (२:३९:२८), महाराष्ट्राची ललिता बाबर (२:४२:५५) आणि केरळची ओ. पी. जैशा (२:४३:३६) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. तिघींनीही यासह आॅलिम्पिक पात्रता मिळवली, तर पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कविता राऊतला यावेळी १३व्या स्थानी समाधान मानावे लागले.पहिल्यांदाच भारतात येऊन जिंकल्याचा आनंद आहे. महिलांमध्ये वेलेंटाइनने तृतीय स्थान मिळवल्याचा आनंद आहे. आता दोघांच्या बक्षीस रकमेतून घर बांधून शेती करण्यावर आमचा प्रयत्न असेल. मी प्रत्येक वर्षाला दोन मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. ३३ किमी अंतर पार केल्यानंतर शर्यत पूर्ण करू शकतो, असा विश्वास आला आणि त्या प्रमाणे आघाडी घेत, अखेरपर्यंत अव्वल राहिलो.- गिडिओन किपकेटर, विजेता (केनिया)दीपक, मोनिका राऊतचे निर्विवाद वर्चस्वमहेश चेमटे ल्ल मुंबईमहाराष्ट्राच्या धावपटूंनी यंदाची मुंबई अर्ध मॅरेथॉन गाजवताना पुरुष व महिला गटात एकहाती दबदबा राखला. कोल्हापूरच्या दीपक कुंभार आणि नागपूरच्या मोनिका राऊत यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याचवेळी पुरुष गटात बेलीअप्पा ए.बी. व इंद्रजीत पटेल यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले, तर महिलांमध्ये मनिषा साळुंखे व मोनिका आथरे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.५ वाजून ४० मिनिटांनी वरळी डेअरी येथून अर्ध मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. या वेळी दीपकला कर्नाटकच्या बेलीअप्पाची कडवी झुंज मिळाली. अनुभवी इंद्रजीतदेखील त्यांच्यामागे काही अंतरावर धावत होता. ७ किमी अंतर एकत्र धावल्यानंतर दीपकने आपला वेग वाढवून जबरदस्त आघाडी घेत, अखेरपर्यंत आघाडी कायम राखली. दीपकने २१ किमीचे अंतर १ तास ६ मिनिटे १ सेंकद या वेळेत पूर्ण केले. बेलीअप्पाने १ तास ६ मिनिटे ३७ सेंकदांची वेळ देत दुसरे स्थान मिळवले, तर इंद्रजीतने १ तास ६ मिनिटे ५९ सेंकादासह कांस्य पदक पटकावले. महिलांमध्ये मोनिका आणि सांगलीची मनिषा साळुंखे यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली.७ - ८ किमी अंतरानंतर मोनिकाने आघाडी घेत वर्चस्व मिळवले. यानंतर तिने कोणालाही आपल्यापुढे जाऊ न देता १ तास १७ मिनिटे २० सेकंद या वेळेत बाजी मारली. मनिषाने (१:१९:१७) आणि मोनिका आथरे (१:२०:८) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. मुंबई मॅरेथॉन २०१२ मध्ये मी माझी जुळी बहीण रोहिणीसह सहभाग घेतला होता. त्या वेळी तिने पूर्ण मॅरेथॉनमध्ये तिसरे स्थान पटकावले होते. यंदा मात्र, ती आजारी असल्याने येऊ शकली नाही. पहिल्यांदा अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना मिळवलेल्या विजेतेपदाचा आनंद आहे. मुंबईतील सकाळचे वातावरण खूप छान होते. आता आगामी आशियाई क्रॉस कंट्रीसाठी तयारी करणार असून, या विजेतेपदाचा त्यासाठी नक्कीच फायदा होईल.वडील ट्रकचालक असून, आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. रोहिणी व लहान भाऊ यांनाही क्रीडाक्षेत्रात उंची गाठायची आहे, त्यामुळे मोठी बहीण म्हणून सगळे प्रयत्न मी करणार आहे. - मोनिका राऊत, विजेतीआशियाई स्पर्धांपासून सातत्याने विविध स्पर्धांत सहभागी होत असून, आम्ही विश्रांती घेतलेली नाही. कदाचित त्यामुळे कामगिरीवर परिणाम झाला. मात्र, तरीही विजेतेपद पटकावले याचा आनंद आहे. आॅलिम्पिक पात्र ठरल्याचा विशेष आनंद असून, मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे की स्टीपलचेसमध्ये, हा निर्णय प्रशिक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळे अद्याप काही निश्चित सांगू शकत नाही. - सुधा सिंग, विजेती भारतीय महिला गट
केनियाच्या भावंडांनी जिंकली मुंबई
By admin | Published: January 18, 2016 3:26 AM