मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाने आणि पुराने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.
केरळ भवनात 200 टन साहित्यनवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे 200 टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या 20 व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.