सिंधुदुर्ग/मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी कोकणात राणेंशी उभा दावा असलेले दीपक केसरकर हे शिंदे गटात आल्याने आता राणे आणि केसरकरांचं पटणार का असा प्रश्न कोकणातील राजकीय वर्तुळातील मंडळी आणि सामान्य जनतेला पडला होता. दरम्यान, त्याचं उत्तर मिळण्याचे संकेत मिळत असून, राणे आणि केसरकर यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आहे.
नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला होता. त्यानंतर राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक केसरकर कुठेतरी म्हणालेत की, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण आघाडीमध्ये आहोत. हे विसरू नका. ही आघाडी टीकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावर आहे. तुम्ही शिंदेंचे प्रवक्ते आहात आमचे नाही. आम्ही तुमची मतदारसंघात काय अवस्था केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या मुलांनी तुमच्याकडून नगरपालिका घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समितीत अनेक सदस्य आमचे आहेत. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्यात, त्यावर तरी चाला. नाहीतरी मतदारसंघातून तुमचा विषय आटोपलाच आहे. तुम्हाला राजकीय जीवनदान मिळालंय हे विसरू नका. मान मिळतोय तो घ्यायला शिका, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही नव्यानेच मीडियासमोर बोलायला लागला आहात. कोणाला काय बोलायचं हे विचारून घ्या, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
तर निलेश राणे यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणेंची काय लायकी आहे, हे आठ वर्षांपूर्वी कोकणातील जनतेने दाखवून दिले आहे. ते विसरले असतील तर जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल. भाजपाच्या नेत्यांनी ठाकरेंवर टीका करायची नाही, असं ठरलं आहे. पण ते सारखी टीका करत होते, त्यामुळे मी त्यांना लहान म्हटलं ते माझ्यापेक्षा वयाने निम्याने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांना लहान म्हणालो. वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्याची आमची संस्कृती आहे. त्यांना ठेवायचा नसेल तर ती त्यांची संस्कृती, असा टोला केसरकरांनी लगावला.