मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून, यांच्या जागी आता हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का, असा रोकडा सवाल केला आहे. (keshav upadhye criticised sanjay raut over sachin vaze issue)
केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. ''ही महान परंपरा राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व नियम पायदळी तुडवत १६ वर्षानंतर सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ही परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आल नाही का? चुकीच काम झाली तर वावटळीच वादळात रूपांतर जनताच करेल'', असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. त्यामुळे आता परमबीर सिंह यांचीच उचलबांगणी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.