मुंबई: सध्या राज्यात सुरू असलेला अजान विरुद्ध हनुमान चालिसा वाद आणखी पेटत चालला आहे. यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता हनुमान चालिसा आणि राज्यातील लोडशेडींच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
'नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रावर भारनियमन लादले'
केशप उपाध्ये यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सरकारवर हिंदुत्वाचे ढोंग करत असल्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले की, "हनुमान जयंतीनिमित्त शिवसेनेने महागाईविरोधात महाआरती केली. पण राज्यात तुमच्या भ्रष्ट कारभारामुळे जनता अंधारात लोटली त्याचं काय? भाजपानं लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र केला होता. परंतु तुमच्या नाकर्तेपणामुळे भारनियमन पुन्हा महाराष्ट्रावर लादलं गेले," अशी टीका केली.
'फक्त केंद्रांकडे बोट दाखवण्याचे काम'ते पुढे म्हणतात की, "हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाऊन माथा टेकले, महाआरती केली. पण तेच शिवसैनिक मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणायला येणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी जमले. इंधनावरील कर कमी करून केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले. मात्र महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याठिकाणी कुठलाही कर कमी न करता केवळ केंद्रांकडे बोट दाखवण्याचं काम केले."
'हिंदुत्वाचे ढोंग बंद करा'ते पुढे म्हणाले की, "देशात इंधनावर सर्वाधिक कर लावणाऱ्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे डोळे बंद करून दूध पिण्याची मांजराची सवय बंद करा. लोकांना सर्वकाही दिसते. राज्यातले अपयश झाकण्यासाठी, दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिशी घालणाऱ्या नवं पुरोगामी पक्षाने हिंदुत्वाचे ढोंग बंद करावे," असा घणाघात उपाध्ये यांनी केला.