काश्मीरबद्दल केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर केएफसी चर्चेत आहे. पाकिस्तानस्थित केएफसी काश्मीर एकजुटता दिवसाचं समर्थन केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या भारतीयांनी केएफसीला दणका दिला. सोशल मीडियावर संताप पाहायला मिळालं. लोकांच्या नाराजीचा भडका पाहून केएफसीनं माफी मागितली. त्यात आता नागपुरातल्या केएफसी आऊटलेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक केएफसीच्या आऊटलेटसमोर आंदोलन करताना दिसत आहेत. केएफसी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू आहे. त्यानंतर आंदोलकांनी केएफसीतल्या कर्मचाऱ्यांनादेखील घोषणा द्यायला लावल्या. आंदोलक रेस्टॉरंटमध्ये काही पोस्टर्सदेखील लावताना दिसत आहेत.
या घटनेचा फोटो फ्रेंड्स ऑफ आरएसएस या ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आला आहे. यामध्ये केएफसी आऊटलेट्समध्ये एक पोस्टर लावलेलं दिसत आहे. त्यावर पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, असा मजकूर आहे.
व्हायरल व्हिडीओ १४ फेब्रुवारी २०२२ चा आहे. त्या दिवशी नागपूरच्या माटे चौकातील केएफसी आऊटलेटमध्ये जाऊन काही तरुणांनी हिंदुस्तान झिंदाबाद, काश्मीर भारताचा आहे, पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचा आहे, अशा घोषणा दिल्या. पाकिस्तानात असलेल्या केएफसीनं काश्मीर एकजुटता दिवसाला पाठिंबा दिला होता. त्याच्या निषेधार्थ नागपुरातल्या केएफसीमध्ये तरुणांनी घोषणाबाजी केली.