मुंबई : सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने, आता सत्ताधारी पक्षातच खडाखडी सुरू झाली असून, राजीनाम्याच्या मागणीने संतप्त झालेल्या भाजपाने, ‘आमच्या अंतर्गत विषयात शिवसेनेने लुडबुड करू नये,’ असे सुनावले आहे. महसूलमंत्री खडसे यांना विरोधकांनी घेरले असतानाच, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून आज त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याने भाजपा नेत्यांची चांगलीच गोची झाली. ‘भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने खडसेंनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावे आणि निर्दोषत्व सिद्ध करून सन्मानाने मंत्रिमंडळात यावे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. खडसे यांच्याविरुद्ध लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणांसह इतर गंभीर आरोप आहेत. अशा वेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा,’ असे शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्यावरील आरोपांची शहानिशा न करता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, आज ते तुरुंगात खितपत पडले आहेत, याकडेही खा. राऊत यांनी लक्ष वेधले.यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, ‘आवश्यक तो निर्णय घेण्यास भाजपाचे नेतृत्व सक्षम आहे. खडसे यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नाही व भाजपा त्यांच्या पाठीशी आहे, हीच भाजपाची भूमिका आहे. शिवसेनेने आमच्या पक्षात उगीच लुडबुड करू नये,’ असे त्यांनी सुनावले. (विशेष प्रतिनिधी)
खडसेंवरून भाजपा-सेनेत खडाखडी; सेनेने मागितला राजीनामा
By admin | Published: June 03, 2016 3:18 AM