मुंबई : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात फक्त तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चुकीची माहिती केंद्र सरकारला देणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.या वेळी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, लोकसभेत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. राज्य शासनाने तसाच अहवाल पाठविल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात गेल्या साडेतीन महिन्यांत राज्यातील ६२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात केवळ विदर्भातील ४४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे देशाची दिशाभूल करणाऱ्या खडसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. निवडणुकीपूर्वी विदर्भातील आत्महत्यांविषयी चाय पे चर्चा करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता मात्र शेतकऱ्यांची थट्टा आरंभली आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून आता बारा दिवस झाले. अद्याप महसूल मंत्र्यांनी विभागीय बैठका घेऊन टंचाईचा आढावा घेतला नाही, तसेच पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर दुष्काळ निवारणाच्या बैठका घेतल्या नाहीत, असे विखे-पाटील म्हणाले. डिसेंबरमध्ये सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले, पण संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना वाटली गेली नाही. त्यातच केंद्राने निकष बदलल्यामुळे आता तीस टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश मदतीच्या यादीत करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा आरोप विखे यांनी केला. नागपुरात अयशस्वी ठरलेल्या पोलीस आयुक्तांना पुण्यात बढतीवर पाठविण्याचा काय अर्थ घ्यायचा, असा सवाल विखे-पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. पुणे शहर आधीच दहशतवादी कारवायांसाठी गाजत असताना हिमांशू रॉय, संजय बर्वे, नागराळे अशा गाजलेल्या अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली आहे. राज्यात गुन्हेगार अक्षरश: मोकाट सुटलेले आहेत. पण मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालकांच्या दबावाखाली का काम करीत आहेत हे कळत नाही, असा चिमटाही विखे-पाटील यांनी काढला. (प्रतिनिधी)
देशाची दिशाभूल करणा-या खडसेंनी राजीनामा द्यावा!
By admin | Published: April 23, 2015 5:44 AM