- श्रेया केने, वर्धा
तंत्रज्ञानापासून ते कौटुंबिक संबंधापर्यंत तर खानपानाच्या पद्धतीपासून ते पोषाखापर्यंत संक्रमण होत असताना पारंपरिक खादीही त्यापासून दूर राहू शकलेली नाही. आता ‘फाइन’ खादीच्या रूपाने आधुनिक, तलम व आकर्षक वस्त्रे आली आहेत. नागपूर विभागातील खादीची वर्षभरात कोट्यवधीची उलाढाल होत आहे.ट्रेण्डनुसार आता कपडे तयार होऊ लागले असून त्याचाही एक ग्राहकवर्ग आहे. खादी परिधान करणे हेदेखील ‘फाइन’ आणि ‘स्टेट्स सिम्बल’ होऊ लागल्याने दिवसेंदिवस मागणी वाढतच असल्याचे दिसून येते. ‘ओरिजनल’ खादी वस्त्रप्रावरणांनाही तितकीच मागणी आहे. ‘हातकताई आणि हातबुनाई’ आजही सुरू असून त्यातून पारंपरिक खादीची निर्मिती होते. मात्र कारागिरांची कमतरता आणि अल्प मिळकत यामुळे नव्या पिढीने पाठ फिरवल्याचे दिसते. मोदी पॅटर्न, ड्रेसला मागणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुर्ता आणि जॅकेटचा पॅटर्न खूपच लोकप्रिय झाला. त्यामुळे जॅकेट आणि खादीचे व खादी सिल्कचे कुर्ते यांची मागणी होऊ लागली. फाइन खादीपासून आकर्षक आणि विविध स्वरूपात वर्षभरात ४-५ हजार जॅकेट तयार केल्याची माहिती बेहरे यांनी दिली. तसेच युवा वर्गाला समोर ठेवून त्यानुसार वस्त्रनिर्मितीचे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.युवकांमध्ये क्रेझनव्या पिढीतही खादीचे कपडे वापरले जात आहेत. जीन्सवर खादीचा कुर्ता घालणारे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी दिसतात. मुली खादी कुर्ता, त्यावर वारली प्रिंट किंवा भरतकाम केलेले असल्यास फ्युजन लूक मिळत असल्याचे सांगतात. वर्धा व नागपूर विभागात वर्षभरात ४ ते ५ मुख्य प्रदर्शने आयोजित केली जातात. त्यात रॉ सिल्क-खादीपासून ते मूळ स्वरूपातील खादी कपडे विक्रीकरिता उपलब्ध असतात. शिवाय खादी ही कपडे बनविण्यापर्यंत मर्यादित राहिली नसून पिशव्या, पर्स, फाइल फोल्डर अशा वस्तू तयार केल्या जात आहेत. खादीचे बदलते स्वरूप लोकप्रिय होत आहे. - संजय बेहरे, सचिव, महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग मध्यवर्ती संघ, नागपूर