- नवीन सिन्हा, नवी दिल्ली
महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित संभाषणाच्या प्रकरणावर केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) बारकाईने लक्ष ठेवून असून ही तपासी संस्था या संभाषणांसंबंधीचा तपशील गोळा करीत आहे.‘सीबीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, ज्यांच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली आहे अथवा ज्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे अशांसंबंधी प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांची आम्ही नेहमीच स्वत:हून दखल घेत असतो. दाऊदचे प्रकरण खूपच संवेदनशील असून खासकरून मुंबईतील अनेक वजनदार व्यक्तींचे त्याच्याशी संबंध असल्याचा संशय आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन व ‘हॅकर’ मनीष भंगाळे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेवून महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावे असलेल्या मोबाईलवरुन कॉल आले असल्याचा आरोप केला होता. खडसे यांनी संबंधित क्रमांकाचा मोबाईल वर्षभरापासून बंद असून त्यावरुन एकही आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात आला नसल्याचे तसेच फोन आला नसल्याचा खुलासा करीत क्लोन करुन हा नंबर वापरण्यात आला असल्याची शक्यता वर्तविली होती. खडसे यांनी यासंबंधीच्या सर्व आरोपांचे खंडन केले असले तरी ‘त्यांचा इन्कार आहे तसाच्या तसा गृहित धरता येऊ शकत नाही’, असे या ‘सीबीआय’ अधिकाऱ्याचे म्हणणे होते.या प्रकरणाचा संपूर्ण तपशील गोळा करण्यासाठी सीबीआयच्या मुंबई कार्यालयास सर्व संबंधित व्यक्ती व संस्थांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.सीबीआयमधील सूत्रांनुसार हे संभाषण ज्या फोन नंबरवरून झाले तो नंबर यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होता, असे या तपासी यंत्रणेने केलेल्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र त्यानंतर हा फोन नंबर (सिमकार्ड) मोबाईल कंपनीकडे का परत करण्यात आला, हे मात्र स्पष्ट होत नाही.मुंबई पोलिसांचा पुन्हा तपासमुंबई- अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमच्या घरच्या फोनवरुन राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना केलेल्या कथित मोबाईल कॉलचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्याबाबत झालेल्या आरोपानंतर अवघ्या काही तासातच खडसे यांना ‘क्लीनचिट’ देणाऱ्या मुंबई पोलिसांनी आता याप्रकरणाचा नव्याने सखोल तपास सुरु केला आहे. मोबाईल बंद असतानाही त्यावर बिले का आली व ती भागविण्यात कशी आली, हा मुद्दा समोर आला असून सर्व शक्यता पडताळून याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. याप्रकरणी मोबाईल हॅकर’ मनीष भंगाळे याच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे.