जळगाव: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने रविवारी चांगलीच खळबळ उडाली. मात्र स्वत: खडसेंसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचा इन्कार केला आहे. तर दुसरीकडे येत्या गुरुवारी २२ रोजी खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र त्यांच्या पक्षांतराचा अर्थात सीमोल्लंघनाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. मात्र आता गुरुवारचा मुहूर्त निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसेंचे विश्वासू कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. तसे संदेश त्यांना मिळाले असल्याचे समजते.
खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मात्र, स्वत: खडसे यांनी त्याचा इन्कार करत मीडियावालेच माझ्या पक्षांतराचा मुहूर्त ठरवत असल्याचे सांगितले. रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले गृहमंत्री अनिल देशमुख व खडसे हे एकाच वाहनातून पोहचले होते. दोघांमध्ये बंद द्वार चर्चाही झाली. एकनाथ खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याविषयी मला माहिती नाही. त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप