मुंबई : महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले एकनाथ खडसे मंगळवारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर नव्हते. त्यांना कोअर कमिटीतून वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा ही बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खडसे वगळता इतर सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. वर्षा बंगल्यापासून खडसे यांचा रामटेक हा बंगला पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीही ते बैठकीला गेले नाहीत. खडसेंची मनधरणी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सोववारची पुढे ढकलल्याची चर्चा होती. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री मुंबईबाहेर असल्याने बैठक मंगळवारी झाली. खडसे यांची मनधरणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंगळवारच्या बैठकीला खडसे आमंत्रण असूनही गेले नाहीत की त्यांना कमिटीतून वगळले आहे, याचा खुलासा भाजपाने केलेला नाही. (विशेष प्रतिनिधी)
खडसे यांना कोअर कमिटीतूनही वगळले?
By admin | Published: June 08, 2016 4:54 AM