खडसे, शेट्टी, मातोंडकर यांच्यासह आठ जणांच्या शिफारशीला कोर्टात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:13 AM2020-11-20T07:13:31+5:302020-11-20T07:14:11+5:30
राज्यपाल नियुक्त सदस्य : सुनावणी २४ नोव्हेंबरला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानपरिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली. त्यापैकी एकनाथ खडसे, राजू शेट्टी, ऊर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझ्झफर हुस्सेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांच्या शिफारशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
या आठही जणांना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देत या याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली.
विधानपरिषद या वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा, या हेतूने राज्यपाल नामनियुक्त आमदार नेमण्याची घटनेत तरतूद आहे. त्यानुसार सामाजिक सेवा, विज्ञान, कला, साहित्य, सहकार चळवळ या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची तरतूद घटनेत आहे.
मात्र, या तरतुदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एकनाथ खडसे, राजू शेट्टी, ऊर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझ्झफर हुस्सेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली, असे दिलीपराव आगळे यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत म्हटले आहे.