नागपूर : विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक (दुसरी सुधारणा) मांडताना प्रचंड गदारोळ झाला. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांची कोंडी केल्याचे दिसून आले.
विधेयकावर ‘पोल’ची मागणी होत असतानाच दुसरे विधेयक मांडण्यात आल्याने सभागृहात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतक:यांच्या मुद्दय़ावरून विरोधक ‘वेल’मध्ये येऊन घोषणाबाजी करीत असतानाच तालिका सभापती रामनाथ मोते यांनी शासकीय विधेयके मांडण्याची सूचना केली.
खडसे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक (दुसरी सुधारणा) मांडले. त्यावर आवाजी मत घेऊन ते संमत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाचा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या लक्षात ही बाब आली. लागलीच घोषणा देणारे सर्व आमदार आपापल्या जागेवर बसण्यास सुरुवात झाली व याचवेळी तटकरे यांनी ‘पोल’ घेण्याची सूचना केली. परंतु, गोंधळात ती कुणाला फारशी लक्षात आली नाही. (प्रतिनिधी)