आनंद डेकाटे नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या कारभारावरून सरकारला धारेवर धरले. खडसे यांनी सोमवारी प्रत्येक मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. चार वर्षांपासून एकच ऐकतोय, जे शक्य आहे, तेच सांगा. हे काय सरकार आहे का? अशा शब्दांत त्यांनी विविध मंत्र्यांना धारेवर धरीत सरकारचे कान टोचले. खडसे यांच्या प्रश्नांनी सरकर अडचणीत येत असल्याने विरोधकांनीही त्यांना साथ दिली.सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच एकनाथ खडसे यांचे उग्र रूप सरकारला पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हाफकीन महामंडळाशी संबंधित पहिलाच प्रश्न होता. त्यावर उपप्रश्न सादर करीत एकनाथ खडसे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शासनाच्या हलगर्जीपणामुळे संशोधन बंद पडले आहे. संशोधकांना योग्य वेतन नाही. संशोधनाला चालना मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला. खडसे यांचे उग्र रूप पाहून बापट यांनी ‘सजेशन फॉर अॅक्शन’ असे उत्तर दिले. यानंतर तिसरा प्रश्न हा स्वत: एकनाथ खडसे यांचाच होता. त्यावर त्यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. ५१ गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न घेऊन मी स्वत: मंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्री स्वत: बोलले, तरी काम व्हायला पाच महिने लागतात. हे काय चालले आहे. हे राज्य आहे की काय? अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.यानंतर शालेय पोषण आहारासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर खडसे यांनी टेंडर घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करीत दोन वर्ष झाले तरी कुणावरही फौजदारी कारवाई का होत नाही. सरकार एसआयटी नेमून चौकशी करणार का? असा जाब शालेय मंत्री विनोद तावडे यांना विचारला. यावर चौकशी केली जाईल, असे सांगत तावडे यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर ऊर्जा विभागाशी संबंधित लक्षवेधीसंदर्भात खडसे यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनाही फैलावर घेतले.जळगाव येथील १७ हजार कृषिपंप कनेक्शन पेंडिंग असल्याचा मुद्दा उपस्थित करीत चार वर्षांपासून एकच ऐकतोय. चार लाख कृषिपंप शेतकºयांना देणार. चारशे कृषिपंप तरी दिले का? ऊर्जा विभागाचे सर्व कार्यक्रम फेल ठरले आहे. ट्रान्सफॉर्मर अपग्रेड नाही. आपण राज्यातील धडाडीचे मंत्री आहात. पालकमंत्री आहात. मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहात. आम्हालाही थोडा न्याय मिळेल का? अशा शब्दात बावनकुळे यांना चिमटा काढला.याच चर्चेत दुष्काळसदृश जिल्ह्यातील वीज कनेक्शन कापण्याचा मुद्दा उपस्थित झला तेव्हा खडसे यांनी सरकारचे यासंदर्भात स्थायी आदेश असल्याचे स्पष्ट करीत सभागृहाला चुकीची माहिती देऊ नका? असे म्हणत मंत्र्याचे कानही टोचले.विरोधकांनीही दिली साथ -एकनाथ खडसे यांच्या प्रश्नांच्या फैºयांनी मंत्र्यांची होत असलेली फजिती पाहून विरोधकांनीही त्यांना साथ दिली. खडसे यांच्या प्रश्नांचे थेट उत्तर द्या, असे विरोधी पक्षातील सदस्य मंत्र्यांना सांगत होते.
खडसेंनी टोचले सरकारचे कान, मंत्र्यांच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी : सर्व मंत्र्यांवर केला प्रश्नांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:21 AM