मनीषा म्हात्रे/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलाला हटकले म्हणून वाहतूक पोलीस शिंदे यांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच खाकीवर हात उचलण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्याभरात तब्बल १० पोलिसांवर हल्ले झाले आहेत. यात महिला पोलिसही जखमी झाल्या. ढोल ताशा वाजविणाऱ्या कार्यकत्यांना समजविणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे. कल्याणमधील या घटनेनंतर पोलीस महासंचालकांनाही ठोस भूमिका घेणे भाग पाडले. मात्र याच वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांच्या मुलांकडून खाकी वर्दी नको रे बाबाचे सूर उमटत असताना दिसत आहे. बीड पोलीस ठाण्यात एसआय म्हणून कार्यरत असलेल्या अर्जुन दुबाळे यांचा मुलगा राहुल. यानेही पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न सत्यात आले होते. दोन्हीही भाऊ पोलीस खात्यात नोकरी करतात. २५ मार्च २००३ रोजी कर्तव्य बजावताना राजकीय वर्चस्वातून त्याच्या वडिलांवर हल्ला झाला. तीन दिवसानंतर त्यांची मृत्यूची सुरु असलेली झुंज संपली. मात्र याबाबत साधा हत्येचा गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याकडे वेळ नव्हता. राहुलच्या लढ्याने गुन्हा दाखल झाला. मात्र सहा महिने आरोपी मोकाटच. अशात हतबल झालेल्या राहुलची न्यायासाठी शासन दरबारी पायपीट वाढली. मात्र पुढे काय? असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता. अखेर सहा महिन्यानंतर आरोपींना पकडले. या लढ्यादरम्यान पोलिसांवर होत असलेले हल्ले त्यात त्यांच्याच दलाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे त्याने पोलीस दलात न येण्याचे ठरविले. अनुकंपा तत्वावर जरी नोकरी मिळणार असेन तरी मी करणार नाही असे मत राहुलने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. मुळात त्याच्यासारखे अनेक राहुल आज याच विचारात आहे. त्याने सर्वांना एकत्र करत महाराष्ट्र पोलीस बॉईज ही संघटना स्थापन केली. यातून ही मुले पोलीस कुटुंबियांचे प्रश्न सोडवू लागले. मात्र आजही पोलिसांबाबत असलेला आदर, धाक काळानुरुप कमी होत चालल्याने या क्षेत्रात येण्यास पोलीस कुटुंबातील मुलेच नकार देत असल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकी काहींच्या घेतलेल्या या प्रतिक्रिया...वडिलांची भेट क्वचितचदिवस रात्र सेवा बजाविणाऱ्या पप्पांना नेहमीच आमचा विसर पडतो. घरात सण- समारंभासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशावेळी माझा त्यांच्यासोबतचा वाद नेहमीचाच आहे. मात्र अशावेळी त्यांच्यावरच्या ताणाचीही जाणिव आहे. जनतेच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांना पर्यायी मार खावा लागत असणे ही फार खेदाची बाब आहे. मी एकवेळ घरी बसेन मात्र पोलीस खात्यात येणार नाही. पोलीस शिपाईचा मुलगा वाढदिवसाठीही वेळ नाहीबंदोबस्ता दरम्यान आईला घरी येण्यास वेळ मिळत नाही. एवढेच कमी की काय माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही तिला कामावर जाणे भाग पडले. पोलीस खाते म्हणजे तिचे सर्वस्व त्यात आम्ही कुठेच नसतो. असे असतानाही होत असलेल्या हल्ल्यांमुळे मी तर तिला नोकरी सोडून घरी बसण्याचा सल्ला दिला. - सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकाची मुलगी बाबा कामाला नको जाऊसवाढत्या हल्ल्यांमुळे मी माझ्या वडिलांना कामावर नको जाऊस असा सल्ला देतो. आॅन ड्युटी २४ तास असताना ते नेहमीच जनतेचा विचार करतात. वेळी- अवेळी जेवण, त्यात वरिष्ठांकडून होत असलेला ताण वेगळाच. असे असताना त्यात या हल्ल्यांची भर पडत असल्याने आपले बाबाही सुरक्षित आहे की नाही अशी भिती मनाला सतावत असते. - पोलीस उपायुक्तांचा मुलगाहुश्श एकदाचे सुटले...पोलीस खात्यातून वडील निवृत्त झाले. याचे आज समाधान वाटते. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांचे दु:ख होत आहे. त्यामुळे भविष्यात संधी मिळाली तरी पोलीस खात्यात नोकरी करणार नाही. निवृत्त एसीपींचा मुलगा