नरेश डोंगरे, नागपूरगुन्हेगारांना मदत करणारेही गुन्हेगारच मानले जातात. गुन्हेगारांच्या कटाची माहिती लपविणाऱ्यांना पोलीस संशयाच्या आधारे आरोपी मानून अटकही करतात. मात्र, नागपुरातील बहुचर्चित ‘जेल ब्रेक’ प्रकरणात खाकी वर्दीतील लोकांनी गुन्हेगारांना मदत केल्याचे उघड होऊनही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यंत्रणा टाळाटाळ करीत आहे. कारागृह प्रशासनाने कारवाईच्या नावाखाली संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाचेच शस्त्र उगारले. निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘कैद्यांसोबत फिक्सिंग’ असल्याचे मान्य करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्याविरुद्ध तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्याचे टाळत आहेत. पोलिसांच्या गणवेषात दडलेल्या गुन्हेगारांवर ‘संघटित गुन्हेगारी’च्या कायद्यानुसार कारवाई करण्याची तत्परता दाखविण्यास कोणीही तयार नाही.३१ मार्चच्या पहाटे नागपूरचे कारागृह फोडून बिशनसिंग रम्मूलाल उके (मध्य प्रदेश), शिबू उर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (मानकापूर), सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (नागपूर), प्रेम उर्फ नेपाली शालीकराम खत्री (नेपाळ) आणि गोलू उर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (नागपूर) हे पाच खतरनाक कैदी पळून गेले. कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. तर चौकशीनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कारागृह) चार तुरुंगाधिकारी आणि पाच पोलीस शिपायांना निलंबित केले. नागपूरचे कारागृह खतरनाक कैद्यांसाठी कसे ‘रेस्ट हाउस’ बनले, येथे राहूनच कैदी कसे खंडणी वसूल करतात, त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी कसे फिक्सिंग आहे आदी बाबी तपासात उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनीही मान्य केले. मात्र अजून एकाही पोलीस अधिकाऱ्याला अटक झालेली नाही.
‘खाकी वर्दी’च्या आड गुन्हेगार !
By admin | Published: April 20, 2015 2:23 AM