मुंबई : माटुंगा येथील नामांकित गुरुनानक खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या स्वीय सहायक यांना गुरुवारी सकाळी २५ हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य अजितसिंग अमरसिंग थेटी हे महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार होते. महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात येत असल्याचे वारंवार समोर आले आहे. खालसा महाविद्यालयात बारावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी एक विद्यार्थिनी प्राचार्य आणि त्यांच्या स्वीय सहायक यांना भेटली होती. त्यांनी मुलीच्या प्रवेशासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या पैशांची पावती देणार नसल्याचे प्राचार्य थेटी यांनी मुलीला सांगितले होते. त्यानुसार, मुलीच्या पालकांनी बुधवारी भ्रष्टाचारविरोधी शाखेकडे तक्रार केली होती. मुलीच्या पालकांनी गुरुवारी सकाळी प्राचार्य अजितसिंग थेटी आणि त्यांच्या स्वीय सहायक निकिता वैद यांची भेट घेतली. या वेळी प्रवेशासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना भ्रष्टाचारविरोधी पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य राहिलेले अजितसिंग थेटी येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीला काही दिवस शिल्लक राहिले असतानाच थेटी यांना अटक झाली आहे.
खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लाच घेताना अटक
By admin | Published: May 09, 2014 2:04 AM