गिरीश राऊत खामगाव, दि. २६- केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार, राज्यात तुरीची खरेदी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. यापैकी विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या राज्यातील ३३ केंद्रांपैकी सर्वात जास्त तूर खरेदी लातूरनंतर बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव येथील केंद्रावर करण्यात आली आहे. या केंद्रावर २३ मार्चपर्यंत ७३ हजार ४३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यापोटी ३७ कोटी ८ लाख ३५ हजार रुपयांचे चुकारे झाले असून, यापैकी २५ कोटी १0 लाख ४४ हजार ७४0 रुपयांचे चुकारे शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. हमीदर योजनेंतर्गत तुरीची खरेदी ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल या दराने दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. (नाफेड) तसेच विदर्भ मार्केंटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन (व्हीसीएमएस)मार्फत करण्यात येत आहे. व्हीसीएमएसमार्फत राज्यात ३३ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे उघडण्यात आली. राज्यात तुरीची मोठी बाजारपेठ समजल्या जाणार्या लातूर येथील केंद्रावर यावर्षी सर्वात जास्त ९५ हजार ३९३ क्विंटल एवढी तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील केंद्रावर ७३ हजार ४३२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूणच राज्यात सर्वात मोठी म्हणून बाजारपेठ म्हणून लातूर आहे; मात्र यावर्षी खामगाव येथील केंद्रावर झालेली तूर खरेदी विक्रमी ठरत आहे. खामगाव येथील केंद्रावर अद्याप तुरीचे मोजमाप सुरूच असून, आवक वाढल्याने या केंद्रावर गत २७ फेब्रुवारीपासून आवक थांबविण्याबाबत विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे येथील केंद्रावर एक महिन्यापासून आवक थांबली आहे, तर विक्रीस आणलेल्या तुरीचे मोजमाप होण्यास महिन्याचा कालावधी लागत आहे.
तूर खरेदीत खामगाव केंद्र राज्यात दुसर्या स्थानी
By admin | Published: March 27, 2017 2:34 AM