ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.01 - नगर पालिकेच्या राजकारणात गेल्या निवडणुकीत नशीब आजमावून विजयी झालेल्या १७ जणांनी आपली दावेदारी पुन्हा सिद्ध केली आहे. यामध्ये नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांचाही समावेश असून, चार जोडप्यांनीही नामांकन दाखल केल्याचे दिसून येते. दरम्यान, तीन जागी नगरसेविका पती तर प्रत्येकी दोन ठिकाणी नगरसेवकांच्या पत्नी आणि पुत्र नशीब आजमावत आहेत.
खामगाव नगर पालिकेच्या रणसंग्रामासाठी प्रशासन सज्ज झाले असून, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये १७ जणांनी आपली प्रत्यक्ष दावेदारी सिध्द केली असून, तीन जागांवर नगरसेविकांऐवजी त्यांचे पती रिंगणात आहेत. यामध्ये नगरसेविका शोभाताई मिश्रा यांचे पती गोविंद मिश्रा, शिवाणी कुळकर्णी यांचे पती शेखर कुळकर्णी, सुनंदा धनोकार यांचे पती राजेंद्र धनोकार यांचा समावेश असून, नगरसेवक अमोल बिचारे यांच्या पत्नी मनिषा बिचारे, कैलास देवताळू यांच्या पत्नी साधना देवताळू देखील रिंगणात आहेत. तर नगरसेविका कमलाबाई धोरण यांचे पुत्र दिलीप धोरण आणि रजनीदेवी मोहता यांचे पुत्र हर्षद धोरण यांना उत्तराधिकारी म्हणून उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, नगरसेवक, नगरसेविका पत्नीसोबतच शहरातील काही नामांकित पत्रकारही या निवडणुकीत नशिब आजमावत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच पत्रकार सतीषआप्पा दुडे, किशोर भोसले, सुनील अग्रवाल आणि धनंजय वाजपे यांनी नामांकन दाखल केले आहे. तर माजी नगरसेवक अशोक जसवाणी देखील रिंगणात उतरले आहेत. त्याचप्रमाणे संपादक संजय मुन्ना पुरवार पाचव्यांदा खामगाव पालिकेने प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर उद्योजक देवेश भगत यांच्या पत्नी हेमलता भगत आणि सुभाषसिंह तुटेजा यांच्या पत्नी प्रदीपकौर यांनी देखील निवडणुकीत दावेदारी ठोकली आहे. त्याचप्रमाणे भारिप बहुजन महासंघातून भाजपात दाखल झालेल्या गणेश सोनोने यांना थेट तर, उपाध्यक्ष वैभव डवरे यांच्या पत्नी अनिता डवरे, नगरसेवक अमोल बिचारे यांच्या पत्नी मनिषा बिचारे यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे.
पुन्हा मिळालेल्या संधीचे दावेदार!
आगामी निवडणुकीत अशोककुमार सानंदा, संजय मुन्ना पुरवार, संदीप वर्मा, अरूण आकोटकर, अर्चना डुकरे, शिवाणी कुळकर्णी, माधुरी राऊत, गीताबाई महातो, रेखा जाधव, अलकाबाई सानंदा, आनंद शहाणे, अर्चना टाले, संतोष पुरोहित, रेखा जाधव, सरस्वती खासणे, प्रवीण कदम, रेखा मुळीक या विद्यमान नगरसेवकांनी आपले नामांकन दाखल केले आहे. या सर्वांचीच उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने, यापैकी कुणीही माघार घेणार नसल्याचे चित्र आहे.
नामांकन अर्ज दाखल करणारे जोडपे
संतोष टाले- अर्चना टाले
संतोष महातो- गीताताई महातो
किशोर भोसले- स्मिता भोसले
शेखर कुळकर्णी- शिवाणी कुळकर्णी