ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - भगवानगड येथील दसरा मेळाव्यात रासप नेते व पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. जानकर यांनी मात्र आपण कोणालाही उद्देशून अश्लाघ्य भाषा वापरली नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
विजयादशमीच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेमध्ये जानकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. पंकजा मुंडे यांना असलेल्या विरोधाच्या मागे बारामतीचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला तसेच 'बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही, ' असेही ते म्हणाले होते. शिवाय, धनंजय मुंडे यांना चमचा म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जानकरांवर संतापले व त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्या वक्तव्याला दोन दिवस उलटून गेल्यानंतर अखेर जानकर यांना उपरती झाली व त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
काय म्हणाले जानकर?
' मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुषीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.'