मुंबई/पुणे/नागपूर : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरक्ष: भाजून निघाला असून, असह्य उकाड्यामुळे मुंबईकरांच्याही जिवाची काहिली झाली आहे. मंगळवारी अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीव्र झालेली उष्णतेची लाट अजून दोन दिवस राहणार असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देत खबरदारी घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. राज्यातील तापमानात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढ होत आहे. आतातर उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून, पुढील किमान दोन दिवस ती कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>नागपूरचे तापमान ४५.९ अंशावर>मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली असून, मंगळवारी अकोल्यापाठोपाठ वर्ध्याचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. उपराजधानी नागपुरातील पारा ४५.९ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या रविवारी नागपुरातील तापमान ४५.७ अंशावर पोहोचले होते. >अकोला ४६.३, वर्धा ४६, नागपूर ४५.९, जळगाव ४५.२, परभणी ४४.६, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर ४४.४, ब्रह्मपुरी ४४.३, नांदेड ४३.५, वाशिम ४३, बुलडाणा, सोलापूर ४२.५, सांगली ४२.३, औरंगाबाद ४२.२, पुणे, मालेगाव ४२, गोंदिया ४१.९, सातारा ४१.३, कोल्हापूर ४१.१, नाशिक ४०.४, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.५, महाबळेश्वर ३४, मुंबई ३३. >अशी घ्या काळजी...तहान लागली नसली तरी अधूनमधून पाणी प्या. हलके, पातळ, सुती कपडे घाला. दुपारी १२ ते ३च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळा.बाहेर जाताना गॉगल व टोपी घाला.चेहरा, डोके ओल्या कपड्याने झाका. घरातून बाहेर पडताना लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी पिऊन निघा. गरोदर माता व आजारी लोकांची विशेष काळजी घ्या.अशक्तपणा, जडपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखावीत. चक्कर येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.>उष्माघाताचे २ बळीचोवीस तासांत उष्माघाताने दोघांचा बळी गेला. भर उन्हात शेतात काम केल्याने खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र महाले यांचा मृत्यू झाला. पैठण येथे रस्त्याचे काम करणाऱ्या छबाबाई कोरडे यांचा बळी गेला.>मान्सून निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठीची (मान्सून) अनुकूलता वाढली असून, पुढील २४ तासांत तो निकोबार बेट, अंदमानचा समुद्र आणि बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचेल, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’ला दिली.
खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा भाजून निघाला
By admin | Published: May 18, 2016 4:40 AM