मुंबई - भाजपा नेते आमदार गोपिचंद पडळकर आणि राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या घणाघाती आरोपांमुळे संतापलेल्या विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र आता गोपिचंड पडळकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले असून, खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, अशा शब्दात त्यांनी वडेट्टीवार यांना प्रतिआव्हान दिले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले की, राज्यातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आलेले नाहीत. आता हे माझ्यावर ५० कोटींच्या मानहानीचा दावा करणार आहेत. त्यांनी तो खुशाल करावा. मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. कारण माझी माय आणि बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबा आहे, असे आव्हान पडळकर यांनी दिले.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहे. तसेच मद्याच्या व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे, असा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केला होता. त्यामुळे विजय वडेट्टीवार संतप्त झाले होते. त्यांनी पडळकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच पडळकरांनी ऐकीव गोष्टींवरून आरोप करू नयेत तर वस्तुस्थितीला धरून आरोप करावेत, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला होता. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र ही फॅक्ट्री कुठे आहे, हे त्यांनी शोधून काढावे, नाही सांगितलं तर मी कोर्टात जाईन, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही त्यांनी पडळकर यांना दिला.