मुंबई : भायखळा येथील आॅर्थर रोड कारागृहामधील महिला शिक्षाबंदी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी, खोटा अहवाल देणाºया आकस्मिकता (कॅज्युलिटी)वैद्यकीय अधिकाºयाने कर्तव्यात कुचराई केली असेल, तर चौकशी केली जाईल, तसेच न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाºया वैद्यकीय अधिकाºयाला निलंबित करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणी महिला तुरुंगाधिकारी, अधीक्षक, तसेच पाच महिला शिपाई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी सगळी चौकशी पारदर्शक पद्धतीने होईल, यामध्ये कोणाही दोषीला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी राज्य महिला आयोगामार्फत सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता असे सदस्य असणारी चौकशी समिती गठित करण्यात आली असून, समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. राज्यातील ६४२ जामीन मिळालेल्या कैद्यांना सुटकेसाठी शासन स्तरावर निधी व अर्थसहाय्यकरण्यात येईल. न्यायाधीन बंदीच्या मृत्युंची माहिती घेऊन ती पटलावर ठेवण्यात येईल, असेही डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. प्रत्येक कैद्याला त्याच्या गरजेनुसार योग्य उष्मांकांचा आहार देण्यात येणार असून, कैदीनिहाय आहारावर होणारा दैनंदिन खर्च वाढविण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना वाचविण्यासाठी वर्गणी म्हणून पैसे गोळा करण्याचा संदेश पसरविणाºया व्यक्तीवर सायबर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्यात येईल. इंद्रायणी मुखर्जीला जेलमध्ये पुरविण्यात येणाºया विशेष सुविधांबद्दल चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कारागृह सुधारणासंबंधी न्या. धर्माधिकारी समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सदस्य सर्वश्री जयंत पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अजित पवार आदींनी सहभाग घेतला.कारागृहात इंद्राणीचा मसाज, फेशियल : भाजपाचे आमदार अॅड.आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी खोटा अहवाल देणाºया जे. जे. रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय, शेलार यांनी धक्कादायक माहिती सभागृहासमोर आणली. आॅर्थर रोड कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने या प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, इंद्राणी कारागृहात मसाज, पॅडिक्युअर, फेशियल अशा सुविधा घेत होती. त्यामध्ये मंजुळा तिला मदत करत होती. त्यामुळे ही बाब गंभीर असून, त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
खोटा अहवाल देणा-या डॉक्टरांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 3:58 AM