मुंबई : किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे. राज्यातील शेतकरी नेत्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू असलेल्या शेतकऱ्याला फटका बसू नये म्हणून संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे केवळ डाव्या पक्षांपुरते मर्यादित राहिले आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवर फारसा परिणाम झालेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुक्रवारी व शनिवारी नेहमीप्रमाणे आवक झाली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा माल मोठ्या प्रमाणात आला होता. मुंबईत भाजीपाल्याची कोणतीही टंचाई नाही. खरीप हंगामाची तयारी व शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होते. त्यामुळे साहजिकच या महिन्यात शेतकºयाला पैशांची गरज असते. खर्चाची पूर्तता करण्यासाठी शेतकरी कृषीमालाची विक्री करतो. त्यातच भाजीपाला व टोमॅटो हे नाशवंत माल असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात त्याची विक्री करताना दिसत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचीही विक्री सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी खबरदारी म्हणून काही दूध संघांनी संकलन केले नव्हते. मात्र पहिल्या दिवशी आंदोलनाची धग न दिसल्याने शनिवारी दूध संघांनी संकलन केले.शनिवारी राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला, त्यामुळेआता खरिपाच्या कामाला आणखी वेग येणार आहे. या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यास त्यात शेतकरी संपाचे आंदोलन वाहून जाण्याची भीती आहे. शेतकरी संपासारख्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाआहे. शेतमालाची नासाडीकरून बळीराजाचेच नुकसान होते, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी घेतली आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही शेतकºयांना वेठीला धरून आंदोलन करण्यास विरोध दर्शविला आहे.७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूधपुरवठा थांबवणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी सांगितले. तर १० जूनला भारत बंद करण्याचा इशारा समितीने दिला आहे. मात्र त्याचा किती प्रभाव पडेल, याबाबत शंका आहे.
संपापासून शेतकरी दूरच!खरिपाच्या तयारीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:51 AM