- विशाल शिर्के पुणे : पुरेसा पाऊस पेरणी न झाल्याने खरीप हंगामातील निम्म्याहून अधिक क्षेत्र बाधित होणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बळीराजाचे त्यामुळे तब्बल साडेसहा ते साडेसात हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्याला याची सर्वाधिक झळ बसणार आहे.जून, जुलै आणि आॅगस्टच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दीर्घ ओढ दिली. सप्टेंबर महिन्यात तर जवळपास पाऊस झालाच नसल्याचे चित्र राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे सिंचन सुविधा असलेला भाग वगळता इतरत्र पिकाच्या उत्पादकतेत मोठी घट दिसून येत आहे.राज्यात ऊस पीक वगळून १४० आणि ऊस पिकासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ आणि ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा अंदाज आहे. त्यात कापूस, उशिरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाच्या तिसऱ्या वेचणीला अधिक फटका बसणार आहे. यंदा सोयाबीनची ४०.४४ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यातील ३२ ते ३३ लाख हेक्टर क्षेत्र काही ना काही प्रमाणात प्रभावीत झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचे १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ८ ते ९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे.१५ जिल्ह्यांत आॅक्टोबर कोरडा लोकमत न्यूज नेटवर्कराज्यात जवळपास सर्व ठिकाणी परतीचा पाऊस झालाच नाही़ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात आॅक्टोबर महिना संपूर्णपणे कोरडा गेला तर ९ जिल्ह्यांत केवळ तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ परतीच्या पावसाने दगा दिल्याने राज्यात सर्वत्र पाणीटंचाईनिर्माण झाली असून रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व त्याचा फायदा मराठवाडा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना होत असतो़ या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होतो. पण यंदा सप्टेंबरमध्ये केवळ एकदाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला़ पण तो ईशान्य भारताकडे गेल्याने मध्य भारत, महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला नाही़ यंदा परतीचा पाऊस होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता.बंगालच्या उपसागरात आॅक्टोबरमध्ये मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते़ त्याचा फायदा मध्य भारताला होत असतो़ पण यंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका बसला आहे़ हवामान विभागाने याचा अंदाज अगोदरच व्यक्त केला होता़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानशास्त्रज्ञमराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांत पावसाळ्याच्या चार महिन्यांतच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़ त्यात आॅक्टोबरमध्ये हमखास पडणाºया परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई झाली असून अनेक ठिकाणी रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे.नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी या १५ जिल्ह्यांत आॅक्टोबर महिना कोरडा ठणठणीत गेला़ याशिवाय पालघर ९१ टक्के, ठाणे ९२ टक्के, मुंबई उपनगर ९५ टक्के, अहमदनगर ९४ टक्के, औरंगाबाद ९७ टक्के, जालना ९८ टक्के, बीड ९२ टक्के, गोंदिया ९९ टक्के, धुळे ९९ टक्के या जिल्ह्यांत अतिशय किरकोळ पाऊस झाला.या शिवाय बाकी जिल्ह्यांमध्येही थोडा फार पाऊस झाला असला तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्टोबरमध्ये पडणाºया पावसाच्या सरासरी इतका पाऊस कोठेही झाला नाही़ त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील पाणीसाठ्यावर झाला असून आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.
राज्याचे निम्मे खरीप क्षेत्र गेले वाया; साडेसहा ते साडेसात हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 1:56 AM