ठाणे : बाळगंगा सिंचन गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी अटक केलेल्या तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफ.ए. एंटरप्रायजेसचे भागीदार अबीद तसेच जाहीद या खत्री बंधूंना ठाणे न्यायालयाने वेगवेगळी पोलीस कोठडी सुनावली आहे. कंत्राटदार निसारच्या आईवडिलांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खत्री बंधू आणि कासट या तिघांना अटक करून लाचलुचपत विभागाने या प्रकरणातील अटकसत्र सुरू केले आहे. शुक्रवारी तिघांना ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्यासमोर हजर केले होते. या वेळी शासकीय अधिकारी कासटला ९ सप्टेंबर तर खत्री बंधूंना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर, निसारची आई जुतैन आणि वडील फतेह या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केल्याने त्यावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. गुरुवारी दोघांना न्यायालयात हजर केल्यावर रिठे अचानक कोसळला होता. त्यामुळे त्याला उपचारार्थ ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर, निसारची यापूर्वी तब्येत बिघडल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. याचदरम्यान, न्यायालयाने त्या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच रिठेपाठोपाठ निसार याच्यावरही ठाणे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खत्री बंधू, कासटला पोलीस कोठडी
By admin | Published: September 05, 2015 1:05 AM