वैभव गायकर,
पनवेल- बालवयात शाळेची ओढ लागून विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्याच्या दृष्टीने पनवेल तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अंगणवाड्याही डिजिटल होऊ लागल्या आहेत. वावंजे विभागातील खुटारी गावातील अंगणवाडी पहिली स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनली आहे.खुटारीसह तालुक्यातील आणखी शंभर अंगणवाड्या डिजिटल होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. खुटारीतील अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण, शैक्षणिकसुविधांमुळे या शाळांकडे सर्वांचाच ओढा आहे. आता तालुक्यातील अंगणवाड्याही सुसज्ज होत आहेत. खुटारीतील अंगणवाडीची इमारत पाहिल्यावर लगेच शैक्षणिक गुणवत्ता कळते. आकर्षक फलक आणि रंगवलेल्या भिंतींपासून मुलांची पावले अंगणवाडीकडे वळतात. प्रत्येक भिंत डिजिटल फ्लेक्सने रंगविली असून त्यावर चित्रलिपीतील बाराखडी काढण्यात आली आहे. राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे, दिशा फलक, वेगवेगळे कार्टून्स येथे पाहायला मिळतात. अंगणवाडी सेविका ज्योती म्हात्रे, तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच जनार्दन पाटील, उपसरपंच सुभाष पाटील, रवी पाटील, विलास म्हात्रे, निकिता म्हात्रे, लीना म्हात्रे, मधुकर म्हात्रे आदींनी यासाठी पुढाकार घेतला असून लोकसहभागातूनच ही अंगणवाडी स्मार्ट डिजिटल झाली आहे. विशेषत: महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, पर्यवेक्षिका प्रियांका कदम यांनी वारंवार मार्गदर्शन केले.