ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - भोसरी येथील जमीन गैरव्यवहारची चौकशी करीत असलेल्या डी. झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसेंचे सर्व अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबविणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादरकरण्याचा त्यांचा दुसरा प्रत्यनही फसला. परंतु काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा मात्र खडसेंना दिली आहे. यावर २९ एप्रिल ला अंतिम सुनावणी होणार आहे.महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा पदाचा वापर करून आपल्या नातेवाईकांना कमी दरात दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावालागला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायधीश डी. झोटीेंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. समितीने पुणेचे जिल्हाधिकारी, महसूल व एमआयडीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविली. त्याच प्रमाणे एकनाथ खडसेंचीही साक्ष नोंदविली. दरम्यान खडसेंनी पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना उलट तपासणीसाठी परत बोलाविण्यासोबत समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेतला. समितीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्यास नकार दिला. तर दुसरा अर्जावर अंतिम निर्णयावेळी निर्णय देणार असल्याचा आदेश दिला. या आदेशावर आक्षेत घेत तो मागे घेण्यासाठी खडसेंनी पुन्हा नव्याने अर्ज केला. यावर सुनावणी घेत हा आदेश मागे घेण्यास नकार देत खडसेंचा अर्ज फेटाळून लावला. प्रत्यक्ष कागदपत्राद्वारे मिळालेली माहिती, स्पष्टीकरणआणि समितीसमोर दिलेली साक्ष अंतर आहे. समितीसमक्षही साक्ष वेळोवेळी बदल्याचे समितीने आदेशात नमूद केल्याची माहिती आहे. काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा खडसेंना दिली आहे. २९ ला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती एमआयडीसीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चंद्रशेखर जलतारे यांनी दिली.
खडसेंना झोटींग समितीचा झटका, आदेश मागे घेण्यास नकार
By admin | Published: April 27, 2017 9:00 PM