राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. राष्ट्रवादी फुटल्याने व पवार कुटुंबातच परस्पर विरोधी उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात काय निकाल लागतो याची धाकधुक सर्वांनाचा लागलेली आहे. अजित पवार गटाने तर थेट मडके फोडण्यापर्यंतचा प्रचार केला आहे. तर मतदानापूर्वी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अशातच शरद पवारांनीबारामतीबाबत विजयाची खात्री दर्शविताना साशंकता निर्माण करणारे वक्तव्यही केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बारामतीत अजित पवारांनी अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. लोक लोकसभेला इकडे, विधानसभेला तिकडे असेही सांगत असल्याचे म्हटले होते. शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या कट्टर विरोधकांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. सख्खे-चुलत संपूर्ण पवार कुटुंब सुनेत्रा पवारांविरोधात प्रचाराला उतरले होते. एवढे करूनही सुप्रिया सुळे निवडून येणार की सुनेत्रा पवार याची शाश्वती कोणाला देता येत नाहीय. जो ज्याचा समर्थक तो त्याचाच उमेदवार जिंकणार असल्याचे दावे करत आहे.
अशातच शरद पवार यांनी एका मुखतीतील प्रश्नावर ठोस दावा न करता साधक-बाधक उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही असे सांगतानाच इथे पैशांचा वापर कधीच झाला नव्हता, पण या निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला असे लोक सांगत आहेत. आता त्याचा परिणाम किती होईल याबाबत आज सांगता येणार नाही, असे वक्तव्य पवारांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे असे मला वाटत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. लोकसभेला 48 जागाच होत्या, माझा पक्ष जरी छोटा होता असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष होता. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जास्त जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. परंतु आपण तिघे एकत्र यायचे त्यामुळे सामंजस्य राखले जायला हवे होते, ते आम्ही पाळल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभेला २८८ जागा आहेत, एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल, असे सांगत यावेळी राष्ट्रवादी कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला दिला आहे.