संतोष येलकरअकोला, दि. १८- येत्या डिसेंबर अखेरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त झाल्यास नवीन वर्षात १ जानेवारी रोजी गावात 'खीर-पुरी'चे गावजेवण करण्याची अनोखी संकल्पना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ग्रामसभेत मांडली.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २0१८ पर्यंत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी यावर्षी जिल्ह्यात ठरविण्यात आलेले शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या घरांमध्ये शौचालय बांधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये गावागावांना भेटी देऊन, शौचालयांचे बांधकाम व त्याचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत विविध प्रकारच्या संकल्पना मांडून शौचालय बांधकामांसंबधी ग्रामस्थांचे प्रबोधन करीत आहेत. गत रविवारी १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांनी अकोल्यापासून सायकल चालवित बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावाला भेट दिली. ग्रामसभेत त्यांनी शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा नियमित वापर करण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. एवढंच नाही, तर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त झाले पाहिजे. डिसेंबर अखेरपर्यंत गाव हगणदरीमुक्त झाल्यास, गावाच्या नावाप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी गावात ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'खीर-पुरी'चे जेवण ठेवण्यात येईल असेही असेही त्यांनी जाहीर केले.
शौचालय बांधकामाला आली गती!जिल्हाधिकार्यांनी ग्रामसभेत केलेल्या आवाहनानुसार बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावात शौचालय नसलेल्या घरी शौचालय बांधकामांना गती आली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालय बांधकामांसाठी पुढाकार घेत शौचालयांची कामे सुरू केली आहेत.- खिरपुरी येथे ग्रामसभेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ३१ डिसेंबरपर्यंत गाव हगणदरीमुक्त झाल्यास गावात 'खिर-पुरी'चे जेवण देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत गाव हगणदरीमुक्त होईल असा विश्वास वाटतो.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.