मुंबई : सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की ठाणे खो-खो संघटनेवर ओढवली. परिणामी, संघटनेने २५ आॅक्टोबर रोजी नवी मुंबई, ऐरोली सेक्टर १६ येथील राधिकाबाई मेघे विद्यालय, विहंग क्रीडा मंडळात सकाळी ९ वाजता जिल्हा संघाची निवड चाचणी आयोजित केली आहे, अशी माहिती दिली.ठाणे जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आणि खो-खो निवड चाचणी स्पर्धा यांमधून जिल्हा संघाची निवड करण्यात येते. मात्र सतत पडणाऱ्या पावासामुळे खो-खो स्पर्धांचे आयोजन शक्य नसल्याचे संघटनेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पावसात स्पर्धा घेतल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड चाचणी स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे संघटनचे म्हणणे आहे. याचा फटका अहमदनगर येथे होणाऱ्या कुमार-कुमारी (१८ वर्षांखालील) खो-खो स्पर्धेलाही बसला आहे. परिणामी, पुरुष-महिला आणि कुमार-कुमारी या निवड चाचणी ऐरोली येथील विहंग क्रीडा मंडळात पार पडणार असल्याने पावसामुळे चक्क निवड चाचणी स्पर्धेलाच ‘खो’ मिळाल्याचे दिसून आले. ठाणे संघ निवडण्यासाठी मागील वर्षीच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत सहभागी खेळाडूंचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
पावसामुळे निवड चाचणी स्पर्धेला ‘खो’
By admin | Published: September 25, 2016 12:40 AM