ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन विरोधकांनी विधान परिषदेत सत्ताधा-यांना धारेवर धरले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोदा पहाड, निकला चुहा असे सांगत विरोधकांना टोला लगावला आहे.
गुरुवारी विधानपरिषदेत चिक्की घोटाळ्यावरुन विरोधकांनी सत्ताधा-यांना चांगलेच धारेवर धरले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली. मुंडे यांच्या आरोपांवर पंकजा मुंडे या उत्तर देण्यासाठी उभ्या राहिल्या असता मंत्री नको मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशी घोषणाबाजी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आरोप करता, मग आरोपांवरील उत्तर ऐकण्याची हिंमत दाखवा असे त्यांनी विरोधकांना सुनावले. यानंतर पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या आरोपांवर मुद्देसूद उत्तर दिले. मुंडेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.