जालन्यातून खोतकर, गोरंट्याल यांच्या पुत्रांची वडिलांच्या विजयासाठी जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 06:18 PM2019-09-24T18:18:15+5:302019-09-24T18:20:04+5:30
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - जालना विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरट्याल यांच्यातील लढत राज्यात सर्वात चुरशीची ठरते. कॉलेज जीवनापासून एकमेकांविरुद्ध उभं ठाकणाऱ्या खोतकर-गोरंट्याल यांच्यातील लढतीत 2014 मध्ये खोतकर यांचा निसटता विजय झाला. विजयाच अंतर केवळ 250 मतांच होतं. त्यामुळे याला खोतकरांचा विजय आणि गोरंट्याल यांचा पराभव म्हणावा का, असा प्रश्न उपस्थित होतो. आता हीच लढाई पुढची पिढीही जोपासणार असं चित्र जालन्यात दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे. अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर मागील तीनते चार वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे युवा सेना विस्तारक, महाराष्ट्रची जबाबदारीही देण्यात आलेली आहे.
दुसरीकडे गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल देखील वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. विरोधी पक्षातील युवकांना पक्षात सामावून घेण्यास ते प्रयत्नशील आहेत. तशा पोस्टही शेअर करण्यात येत आहे. एकूणच अक्षय आणि अभिमन्यू राजकारणात स्थिरावण्यासाठी कुटुंबीयांकडून पाठबळ मिळत आहे. त्यामुळे खोतकर-गोरंट्याल कुटुंबातील राजकीय लढतीचा वारसा अक्षय आणि अभिमन्यू पुढे चालवणार असचं दिसत आहे.
टीका न करता काम करण्यावर भर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना राज्य विस्तारकाची जबाबदारी मिळाली आहे. त्यानुसार मतदारसंघात काम करत आहे. आतापर्यंत 75 गावं आणि काही तांड्यांचा दौरा पूर्ण केला आहे. कुणावरही टीका न करता राजकारण करण्यावर भर असून भविष्यात बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी काम करायचा निश्चय केला आहे.