मुंबई : मंत्रालयातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांची २५ हजाराच्या जामिनावर सुटका झाली. तथापि, त्यांचा पासपोर्ट जप्त करत चौकशीदरम्यान त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी अशोक जाधव यांना वांद्रे येथील शासकीय निवासस्थान आणखी वर्षभरासाठी देण्याच्या मागणीसाठी कडू हे जाधव यांना घेऊन मंगळवारी गावित यांच्याकडे गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि याच रागातून कडू यांनी गावितांना मारहाण केली होती. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कडू आणि जाधव यांच्याविरुद्ध मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.बुधवारी रात्री कडू आणि जाधव पोलीस ठाण्यात हजर झाले. दोघांनाही अटक करत गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांचीही प्रत्येकी २५ हजाराच्या जामिनावर सुटका केली. ते बाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिला. तसेच पुढील चौकशीसाठी त्यांना वेळोवेळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचनाही कडू यांना देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)
बच्चू कडूंची जामिनावर सुटका
By admin | Published: April 01, 2016 1:56 AM