अकोला: अकोला जिल्ह्य़ातील गोरेगाव बु. येथे किडनी आणि हायड्रोसीलच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गावकरी कमालीचे धास्तावले आहेत. किडनी आजाराने तीन वर्षांत चौघांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त महिला व पुरुष या आजाराने बाधित आहेत. दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा व आरोग्य प्रशासन याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असून, गावकर्यांत संताप व्यक्त होत आहे. गोरेगाव बु. येथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात क्षार असल्यामुळे ते पिण्यास योग्य नाही. पाण्यातील क्षाराचे प्रमाण दोन हजारांवर पोहोचल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संकटावर मात करण्यासाठी गावकर्यांनी गावापासून २ किलोमीटर अंतरावर कूपनलिका तयार केली आहे. येथून आता गावकर्यांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यातही क्षाराचे प्रमाण आहे, हे विशेष. गोरेगाव बु. येथे मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्यामुळे गावकर्यांना नाईलाजास्तव हातपंपाचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. तीन वर्षांत चार जणांना हकनाक किडनी आजाराने जीव गमवावा लागला असला तरी प्रशासनाला जाग आली नाही. सद्यस्थितीत गावातील ३० पेक्षा जास्त महिला व पुरुष विविध खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. गावातील किडनी आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता लहान मुले व तरुणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. तरुण पिढी या आजाराने बर्बाद होण्याची दाट शक्यता आहे. गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराने गावात चंचुप्रवेश केल्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या वाढत आहे. गावात आरोग्य केंद्र नसल्यामुळे ही समस्या शासन दरबारी पोहोचविण्यास विलंब होत आहे. किडनी आजाराने निम्मे गाव कवेत घेतले असून, यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील विहिरींच्या जलपातळीत घट झाली असल्यामुळे विहिरीच्या पाण्याचा उपयोग होत नाही. गावामध्ये १२ हापसी असून, यापैकी चार बंद आहेत. हापसीशद्वारे येणारे पाणी क्षारयुक्त आहे, हे माहीत असतानासुद्धा लहान मुले, महिला, वृद्ध आणि तरुण मंडळी या पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहेत. यामुळे भविष्यात किडनी रुग्णांची संख्या वाढणार, यात तीळमात्र शंका नाही.
गोरेगाव येथे किडनी आजाराचा प्रकोप ३ वर्षांत ४ दगावले, ३० जणांना बाधा
By admin | Published: May 14, 2014 6:12 PM