अकोला : किडनी तस्करीतील मुख्य आरोपी सांगलीचा शिवाजी कोळी यास १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधवला अटक केल्यानंतर, त्यांच्या चौकशीदरम्यान शिवाजी कोळी, विनोद पवार यांच्यासह नागपूर, औरंगाबाद येथील काही डॉक्टरांची नावे समोर आली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून, रविवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील मांडवा येथील विनोद पवार व त्याच रात्री सांगलीच्या शिवाजी कोळीला अटक केली. विनोद पवारला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी दुपारी शिवाजीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शिवाजी हा किडनी तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही डॉक्टरांचाही प्रकरणात समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींनी किती लोकांच्या किडन्या काढल्या, याची माहिती घ्यायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगून, पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)
किडनी तस्करीतील सूत्रधारास कोठडी
By admin | Published: December 08, 2015 1:46 AM